दिवाळीच्या दिवसात घरात न रहाण्याचा रिवाज या वर्षी पाळता आला नाही. प्रथम व्यवसायानिमित्त देशाबाहेर रहाणे झाले. मग परत आल्यावर तीन-चार कुटुंबातील लहान-मोठया सर्वांना सुट्टी मिळून एकत्र भारतदर्शन करण्यास हे दिवस बरे असतात असे जाणवल्यामुळे दिवाळीची सुट्टी घराबाहेर असेच समीकरण झाले होते. या वर्षी Swine-Flue देवतेच्या कृपेने मुलांच्या सुट्या कधीच संपल्या व आम्ही पुण्यातच होतो. मुंबईहून पुण्यात नुकतेच स्थलांतरीत झालो असल्यामुळे आम्हाला हे शहर नविनच होते. ’तेथे’ हरवलेली मराठी संस्कृती येथे ठायीठायी भेटत होती. मग कोणीतरी सांगितले की दिवाळीच्या दिवसात पहाटॆ पुण्यात सारसबागेत पणत्यांची आरास करतात. लगेच आमच्या फोटो काढण्यास आसुसलेल्या स्वार्या सज्ज झाल्या.
पहाटे साडेपाचला निघण्याचा हुकुम गृहमंत्र्यांनी जारी केला होता त्यावेळेबरहुकुम प्रस्थान केले. जसजशी सारसबाग जवळ येऊ लागली तसतसे रस्त्यालगतचे पार्किंग फुल्ल दिसू लागले. जरा आश्चर्यच वाटू लागले. पुण्यात येवढया लौकर हे अपेक्षित नव्हते. त्यामुळे पहिला मोकळा slot मिळल्यावर गाडी पार्क करून पायउतार झालो. थोडे पुढे गेल्यावर महालक्ष्मीच्या मंदिराचा कळस दिसला. देवीचे दर्शन घेऊन पुढे जावे असा विचार करित होतो. पण दाराबाहेरील भलीमोठी रांग पाहून पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. विचार रद्द केला. बाहेरूनच हात जोडले व सारसबागेकडे मोर्चा वळवला.
सारसबागेच्या दारापासून गर्दी तर होतीच. अगदी “सवाई गंधर्व”ला रमणबागेत असते तशी. रेटारेटी नाही पण जरा थोडे जास्त इकडॆतिकडे हलले तर कोणाला तरी धक्का लागेल येवढी. जवळूनच स्पिकर्स टेस्ट केल्याचा आवाजही येत होता. तरुणाईच्या जोडीने बुजुर्गही तेवढेच होते. सर्वचजण सणाचे ठेवणीचे कपडे घालून सजले होते. कदाचित म्हणूनच बुजुर्गही तरुणच दिसत होते. ती तरुणाई अंगावर झेलत झेलत तळ्यातील गणपतीच्या कमानीतून आत शिरलो. मंदिराभोवताली खरच पणत्यांची व रांगोळ्यांची आरास मांडली होती. माझा कॅमेरा आता “सुटला” होता.
आत गाभार्यात श्रींचे अभ्यंगस्नान चालू होते. अतिशय देखणी उजव्या सोंडेची मूर्ती आहे. “कृपया मूर्तीचे फोटो काढू नये” असे बोर्ड दिसल्यामुळे कॅमेरा म्यान केला व श्रींना मनसोक्त मनात साठवून घेतले. मग पुन्हा रांगोळ्यांचे फोटो काढण्यास बाहेर पडलो.
भोवताली लावलेल्या पणत्या वार्यामुळे विझत होत्या. एक पणती विझली कि ती पुन्हा चेतवण्यास दहा हात पुढे सरसावत होते व सर्व दिवे तेवते ठेवत होते. ते पाहून मन आत कुठेतरी हलत होते, डोलत होते व आतली पणती चेतवत होते.
आता देवळातून बाहेर पडून सारस बागेतील तळ्यात फुललेली कमळे टिपत टिपत पुढे सरत होतो.
अचानक बासरीचे सूर व जोडीने सतारीची दिडदा दिडदा ऐकू येऊ लागली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रायोजित कार्यक्रमाची मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली होती. बरेच लोक उपस्थित होते. मनापासून दाद देत होते.

सकाळच्या रागांनंतर “घनःश्याम सुंदरा”चे स्वर बासरी व सतारीवर आळवले जाऊ लागले. पाखरे आपापली घरटी सोडून आकाशात झेपावली होती.
पूर्वॆला उषेचा रक्तिमा पसरला होता व मन्दिराच्या दारात आता भाविकांची दाटी झाली होती.
आमची पाऊले दिवाळीच्या फराळावर आडवा हात मारायला परत फिरली, मनात कुठेतरी हरवलीशी वाटणारी लहानपणीची दिवाळी पुन्हा एकदा भेटल्याचे समाधान घेऊन.
Very very beautiful!!!
Makes me homesick. 😦
Great snaps. I went through your posts and saw that you have an eye for knowing which moments to capture when. I loved the first snap – the shadow cast by the diya – that was beautifully shot and the one of the evening sky and the flock of birds – very sharp.
I myself have started taking a fleeting interest in photography – obsessed with landscapes, sunrise and sunsets shots. My sad digital camera does not do justice to landscapes. But it does try its best when it comes to shooting the fireball. I might put up some of them on my blog. Will surely let you know to get your comments on that. You have a great blog. Keep up the good work.